एम.व्ही.पी. समाजाचे

के. टी. एच. एम. महाविद्यालय

(के.आर.टी. कला, बी.एच. वाणिज्य, ए.एम. विज्ञान महाविद्यालय.)

MVP SAMAJ'S

K.T.H.M. COLLEGE, Nashik

(K.R.T. Arts, B.H. Commerce and A.M. Science College.)

Online Services

Links to E-Books from Google Drive

Events & Programs : 

1. कर्मवीर रावसाहेब थोरात कला, भाऊसाहेब हिरे वाणिज्य आणि आण्णासाहेब मुरकुटे विज्ञान (के. टी. एच. एम.) महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागामार्फत वाचनसंस्कृती : वाचनाचे महत्व " या विषयावर श्री. शरद पाटील यांनी माहिती संकलन करून विद्यार्थ्यांच्या वापरासाठी ती जतन केली. तरी सर्व विद्यार्थ्यांनी " वाचनसंस्कृती वाचनाचे महत्व  या संधीचा लाभ घ्यावा असे ग्रंथालय विभागाकडून आवाहन करण्यात आले.  

थोडे काही वाचनाची गोडी व आवड निर्माण करणेबाबत.......

"दिसा माजी काही तरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचीत जावे" असे रामदासस्वामी फार पूर्वीपासून सांगून जातात. ज्या माणसाचे आयुष्य अनुभव आणि वाचनाने समृध्द झाले आहे असा माणूस आपल्या क्षेत्रात तर उत्तम कामगिरी करतोच, पण चांगला माणूस म्हणनू देखील तो नावाजला जातो. प्रत्येकाची स्थिती,काळ,परिस्थिती, या नुसार अनुभव तर मिळत असतो, पण वाचनातून ज्ञान आणि समज मिळते.

काय वाचावे ?

सर्वात मुलभूत प्रश्न पडतो तो म्हणजे वाचन करायचं आहे पण नेमकं काय वाचावं? आम्ही रोज सोशल मिडियावर एकमेकांना पाठवलेल्या गोष्टी वाचतो, तेही वाचन आहे का? ते वाचन पुरेसं आहे का? तर नाही! वाचन म्हणजे तुम्ही एखादे पुस्तक, वर्तमानपत्र, लेख, अभिप्राय अशी एखादी गोष्ट वाचत असाल जिचा लेखक तुम्हाला माहिती आहे. सोशल मीडियावर फिरणारे निनावी मेसेज म्हणजे वाचन नव्हे.

सुरवातीला वृत्तपत्र किंवा मासिक यापासून तुम्ही सुरवात करू शकता. तुम्हाला कळतच नसेल की तुम्हाला नक्की काय वाचायला आवडेल, तर वर्तमानपत्रात तुम्हाला सामाजिक, आर्थिक, ललित, निबंध, बातम्या सर्व स्वरूपाचे वाचन साहित्य वाचायला मिळेल. त्यातून तुम्हाला काय आवडते ते वाचणे सुरु ठेवा आणि त्या विषयासंबंधीची पुस्तके, शोधनिबंध अशा अनेक गोष्टी तुम्ही मिळवून तुम्ही वाचू शकता.

कसे वाचावे ?

तंत्रज्ञान वेगाने बदलते आहे तशी वाचनाची साधने बदलत आहेत. आता तुम्ही इ-बुक्स,इ-मॅगझिन, इ-वृत्तपत्र असे सर्व साहित्य तुमच्या मोबाईल किंवा संगणकावर वाचू शकता. ते मिळवण्यासाठी ग्रंथालय, दुकान कशाचाही शोध घेण्याची गरज नाही. तुमच्या बोटाच्या टोकावर सर्वकाही मिळू शकते.

तुम्हाला जर वाचनाच्या पारंपारिक पद्धतीला चिकटून राहायचे असेल, तर थेट पुस्तके, वृत्तपत्र आणून भौतिकमाध्यमाने तुम्ही वाचू शकता. याशिवाय 'किंडल' नावाचे एक नवीन तंत्रज्ञान सध्या प्रचलित आहे. ज्यावर तुम्हाला हवे ते पुस्तक, वर्तमानपत्र तुम्ही मोबाईल प्रमाणे पण अधिक सोयीस्करपणे वाचू शकतो. त्यामुळे तुमच्या डोळ्यावर तानाही येत नाही.

वाचन कशासाठी ?

१. बुद्धीला चालना :- मेंदू जितका कार्य करत राहील तितकी त्याची कार्यक्षमता वाढते असे सांगितले जाते. वाचन म्हणजे मेंदूसाठीची कसरत किंवा व्यायाम आहे. वाचनाने मेंदू सतत कार्यरत राहतो आणि अधिक कार्यक्षम होतो. म्हणून लहान मुलांमध्ये वाचनाची सवय लागली, तर पुढे मोठे होऊन ही मुलं हुशार बनतात.

२. ताणापासून सुटका :- व्यस्त आणि धावपळीच्या जीवनात वाचन हे असे औषध आहे जे तुमचा कंटाळा, ताण झटक्यात दूर करतं. पुस्तक वाचताना तुम्ही तुमचं आयुष्य विसरून एका वेगळ्या जगात असता. हे जग तुम्हाला ताण विसरायला भाग पडते.

३. शब्दसंपत्ती :- माणसाची श्रीमंती त्याच्या शब्दसंपत्तीवर पहिली जाते. फक्त याचसाठी नाही, तर तुमच्या आयुष्यात तुम्ही आपले म्हणणे किती योग्य शब्दात मांडू शकता, यावर तुमचे यश अवलंबून आहे. वाचनामुळे तुम्ही उत्तम संवाद साधू शकता, तसेच तुमच्या लेखन कौशल्यात भर पडते. त्यामुळे जितका जास्त शब्दसंग्रह, तितके यश तुमच्या जवळ असते.

४. ज्ञान :- ज्ञान मिळवण्यासाठी सर्वात विश्वासार्ह स्त्रोत म्हणजे पुस्तकं आहेत. ते ज्ञान स्वयंपाकातल्या एखाद्या पदार्थाचे असेल किंवा तत्वज्ञानातील एखाद्या संकल्पनेचे असेल, तुम्ही वाचत आहात म्हणजे तुमच्या ज्ञानामध्ये वाढ होत आहे. थोडक्यात, वाचन हा ज्ञान मिळवण्याचा एक उत्तम मार्ग आहे.

५. एकाग्रता :- वाचन ही एक साधना आहे, ज्यातून बुद्धी आणि मन यांना एक बैठक मिळते. ध्यान, नामस्मरण, मेडीटेशन या गोष्टी लक्ष एकाग्र करण्यासाठी जित्या उपयुक्त आहेत तितकीच वाचन देखील आहे.

६. मनोरंजन :-  डोळ्यांना, मेंदूला ताण देणाऱ्या मोबाईल गेम्सपेक्षा वाचनाची करमणूक केव्हाही चांगली. शिवाय ब्ल्यू व्हेल आणि पबजी सारख्या मनोरंजनापेक्षा कितीतरी पटीने वाचनाची सवय लाभदायक आहे.

वाचनाचे शेकडो फायदे आहेत आणि वाचन का करावे, याची अनेक करणं आहेत. वरील काही करणे शास्त्रीय संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून समोर आली आहेत. त्यामुळे पुस्तकांना आपला मित्र बनवा आणि आपलं जीवन समृद्ध करा.

2. वाचन आणि प्रेरणा दिन

के. टी. एच. एम. महाविद्यालयात दरवर्षी १५ ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. पण मागील वर्षांपासून कोविड - १९ चे जागतिक संकट असल्याने  महाविद्यालयातर्फे मान्यवरांनी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून वाचन प्रेरणा दिन साजरा केला.

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्म दिवसाचे औचित्य साधून १६ ऑक्टोबरला ग्रंथप्रदर्शन भरवून साजरा करीत आहोत.आज ज्योती बुक स्टोअर्स यांच्यावतीने सदर ग्रंथ प्रदर्शन हे आपल्या महाविद्यालयाच्या कार्यालयासमोरील पोर्चमध्ये लावण्यात आले आहे. मा.वसंतराव खैरनार यांचे उपस्थितीत व मा.प्राचार्य डॉ.व्ही.बी.गायकवाड यांचे हस्ते या प्रदर्शनाचे उदघाटन सकाळी 10 वा झाले त्या वेळी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

" वाचनसंस्कृती  जतन करणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य तर आहेच परंतु एक अध्यापक या नात्याने व्यासंगवृत्ती अबाधित ठेवण्यासाठी ग्रंथ खरेदी करून तो वाचणे  वा  स्नेही आप्तांना विशेष निमित्ताने भेट देऊन वाचनासाठी प्रवृत्त करणे ही सुद्धा एक जबाबदारी आहे.वाचनसंस्कृती जपण्यासाठी पडलेले हे एक पाऊल आहे असे मानू या. 'ग्रंथ म्हणजे समाजसुख किंवा ग्रंथ उजळती मार्ग आपुला' या उक्तीला जागत आपण  आपल्या आवडीचे किमान एक तरी पुस्तक उद्या खरेदी करूया (सक्ती नव्हे) ,आणि  वाचनसंस्कृती जपुया " असे आवाहन प्राचार्य डॉ.व्ही.बी.गायकवाड सरांनी केले.

ग्रंथ प्रदर्शन वेळ - सकाळी 10.00 ते दुपारी. 3.30

१५ ऑक्टोबर - वाचन प्रेरणा दिन (डॉ. कलाम थोडक्यात माहिती)

डॉ. अवुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम तथा ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रामेश्वर येथे झाला होता.

शिक्षण :

त्यांचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्या आणण्याचा व्यवसाय करीत. त्यांचे वडील व लक्ष्मणशास्त्री नावाचे पुजारी घनिष्ठ मित्र होते. त्यांच्यातील अध्यात्मिक चर्चा कलाम ऐकत असत. डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम्‌ला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्‌‍सी. झाल्यानंतर त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.

 

स्वभाव :

विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, पुस्तके वाचनाचा व मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. डॉ. कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. पुढील वीस वर्षांत होणाऱ्या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत असत.

 

कार्य :

१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पिएसएलव्ही (सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला. त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असे व सहकाऱ्यामधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.

 

गौरव :

अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्म दिवस वाचन प्रेरणा दिन ” म्हणून पाळला जातो.

भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्मविभूषण' व १९९७ मध्ये ' भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला.

 

निधन :

ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची प्रकृती शिलाँग येथील आय.आय.एम.च्या कार्यक्रमात व्याख्यान देताना तबेत बिघडली. शिलाँगमधीलच एका रुग्णालयात त्यांनी २७ जुलै, इ.स. २०१५ रोजी अखेरचा श्वास घेतला.कलाम यांनी केलेल्या कार्याचा उपयोग भारतासाठी विविध कार्यात झाला आहे.

 

महत्त्वाचे :

वाचन प्रेरणा दिन साजरा करताना डॉ. कलाम यांची पुस्तके वाचली तर खऱ्या अर्थाने त्यांना आज दिनी आदरांजली ठरेल असे मान्यवरांनी व्यक्त केले. त्यासाठी   डॉ. कलाम यांनी लिहिलेले पुस्तके व त्यांच्यावर लिहिलेले pdf स्वरूपात मोफत उपलब्ध असलेल्या पुस्तकांची लिंक खाली दिली आहे सर्व विद्यार्थांनी त्याचा वापर करावा असे आवाहन मान्यवरांनी केले.

https://www.pdfdrive.com/search?q=Dr.+APJ+Abdul+Kalam&pagecount=&pubyear=&searchin=&em=

 

 

Visitor Number:

Label Designed and Developed by - Computer Science Department